स्वच्छतेसाठी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची फौज

पुणे – दक्षिण पुण्यातील पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून तब्बल साडेसहा हजार स्वच्छता कर्मचारी तैनात केले आहेत. ज्या भागात पुराचे पाणी घुसले आहे त्या भागात कचरा तसेच गाळाचे साम्राज्य असल्याने तातडीची स्वच्छता करण्यासाठी हे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे 10 हजार नागरिक बाधीत झाले असून हजारो घरांमध्ये कचरा, गाळ साचला आहे. तसेच, अनेकांच्या घरात फर्निचर आणि इतर साहित्याचा कचरा साठला आहे. याशिवाय, दत्तवाडी येथे आंबिल ओढ्याच्या फरशी पुलावरही कचरा वाहून आला असून शुक्रवारी दिवसभरात 20 ते 25 टन कचरा आणि गाळ काढण्यात आला आहे.
या पावसाने धनकवडी- सहकारनगर, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी तसेच कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने आंबिल ओढ्याच्या कडेची माती तसेच भिंतीचा ढिगारा वाहून आला तर, कात्रज तलावाच्या भरावातील माती तसेच ओढ्यात सर्वत्र टाकण्यात आलेला कचरा मुख्य रस्ते तसेच अनेक घरांमध्ये घुसला आहे. त्यामुळे या पाचही क्षेत्रीय कार्यालयांकडून या भागात स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आजपासून प्रत्येक घर, परिसराची स्वच्छता
पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून सुमारे 3 हजार 700 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहे. 5 क्षेत्रीय कार्यालयांचे 605 कर्मचारी, 2100 कंत्राटी कर्मचारी, 400 स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी तसेच 400 पथ विभागाकडील ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेकडून शनिवारपासून प्रत्येक घर आणि परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी वाहन विभागाकडून शुक्रवारपासूनच 24 टीपर, 12 हायवा आणि 10 पेक्षा अधिक क्रेनचा समावेश आहे.

गाळाचे साम्राज्य
पूरग्रस्त भागात गाळाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेकडून दिवसभरात शहरातील वेगवेगळ्या भागांत तब्बल 40 ते 50 टन गाळ काढला. मुख्य रस्ता तसेच नाल्याच्या आसपासचा हा गाळ असून अद्याप नागरिकांच्या घराच्या परिसरात पूर्णत: स्वच्छता सुरू करण्यात आलेली नाही. हा गाळही पुढील 2 दिवसांत स्वच्छ करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.