यान्गोन (म्यानमार) – म्यानमारमधील लष्करी प्रशासनाने गेल्या आठवड्यात केलेल्या बंडानंतर सोशल मिडीयावरील निर्बंध अधिक कडक केले आहेत. म्यानमारमध्ये ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही आज बंदी घालण्यात आली. लष्करी शासनाच्या हुकुमशाहीविरोधात नागरिकांनी आज पुन्हा देशभरात भांडी आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या वाजवल्या आणि निषेध व्यक्त केल.
दोनच दिवसांपूर्वी लष्करी शासनाने फेसबुकच्या वापरावर बंदी घातली होती. त्यानंतर शुक्रवारी इंटरनेटची सेवा खंडीत केली. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून बनावट बातम्या पसरवल्या जात असल्याचे कारण देऊन या दोन्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सक्रिय असलेल्या नेटिझन्सना आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करणे अशक्य झाले. दोन्ही सोशल मीडियाच्या सेवेला काल रात्रीपासून बंद करण्यात आल्याचे उघड झाले.
देशातील प्रसिद्धी माध्यमांवर कमालीचे निर्बंध घालण्यात आले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून आंदोलन भडकावले जात असल्याचे निदर्शनास आल्यावर फेसबुकवर सर्वप्रथम बंदी घातली गेली होती.
राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या 300 सदस्यांनी शुक्रवारी स्वतःला एकमेव कायदेशीर लोकप्रतिनिधी म्हणून घोषित केले आणि देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय लोकमान्यता मिळवून देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
म्यानमारमधील लष्करी बंड मागे घेतले जावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेज यांनी शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्धीस दिले. म्यानमारमध्ये लोकशाही स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच लष्कराने ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सुरक्षा परिषदेकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राच्या विशेष दूत ख्रिस्चियन स्क्रानर बर्गनर या लष्कराच्या संपर्कात असून लष्करी बंडाविषयीचा निषेध त्यांनी नोंदवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाच्या सल्लागारांनाही घेतले ताब्यात
आंग सान स्यू की यांना आर्थिक विषयावर सल्ला देणारे ऑस्ट्रेलियातील आर्थिक तज्ञ प्रो. सीन टर्नेल यांनाही लष्करी शासनाने ताब्यात घेतले आहे. प्रो. टर्नेल यांनी स्वतः बीबीसीला याबाबतची माहिती दिली. “मला ताब्यात घेतले गेले आहे. मात्र त्यामागील कारण समजू शकलेले नाही.’ असे टर्नेल यांनी सांगितले. आपल्यावर कोणतीही जबरदस्ती केली गेलेली नाही. मात्र मुक्तपणे संचार करण्याची मुभा नसल्याचेही ते म्हणाले. टर्नेल यांना कोठे ठेवले गेले आहे, हे समजू शकलेले नाही. त्यांना एका हॉटेलवर ठेवण्यात आले असल्याचे पूर्वी समजले होते. प्रो. टर्नेल यांना झालेल्या अटकेची ऑस्ट्रेलियाने गंभीर दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मरीज पायन यांनी म्यानमारमधील ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांना प्रो. टर्नेल यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.