यवत – रात्रीच्या वेळी ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्या ताब्यातील 40 टन मक्याने भरलेल्या ट्रकसह चोरी केल्याची घटना बुधवारी (दि. 28) रात्री दीडच्या सुमारास शिरूर-सातारा राज्य मार्गावर दौंड तालुक्यातील पारगाव गाव हद्दीत घडली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या पोलीस पथकामार्फत तपासाची चक्रे फिरवीत चोरीला गेलेला ट्रक आणि ट्रकमधील माल हवेली तालुक्यातील पेरणे फाटा परिसरातून चोवीस तासांच्या आत हस्तगत केला आहे. तसेच एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी माउली मच्छिंद्र बांदल (वय 28, रा. पारगाव, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती अशी की, ट्रक चालक अल्ताफ खलील शेख (वय 24, रा. औरंगाबाद) हे (बोदवड, जि. जळगाव) येथून ट्रक (क्र. एमएच 20 इएल 1750) हा 40 टन मक्याने भरलेला ट्रक अहमदनगर, शिरूर मार्गे चौफुलावरून (लोणंद, जि. सातारा) येथील एका कंपनीत खाली करण्यासाठी जात होते. शेख यांच्याबरोबर आणखी दोन ट्रक होते.
पैकी एका ट्रकची समोर येणाऱ्या पिकअपला धडक झाल्याने दोन ट्रक (पारगाव, ता. दौंड) गावच्या हद्दीत थांबले होते. त्यावेळी शेख यांनीही आपल्या ताब्यातील ट्रक तेथे रात्रीच्या वेळी थांबवला. यावेळी अज्ञात चोरट्याने ट्रक चालक शेख यांना मारहाण करून 40 टन मक्यासह ट्रक चोरून नेला. घटनेत मका व ट्रक अशी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. चोरीची फिर्याद ट्रक चालक शेख यांनी यवत पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांना पेरणे फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असलेला मिळून आला.