लंडन :- ब्रिटनच्या प्रसिद्ध ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉ. समीर शहा यांची निवड करण्यात आली आहे. ७१ वर्षीय शहा यांना टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वोत्तम सेवेसाठी २०१९ मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्परर या किताबाने गौरवण्यात आले होते.
आता रिचर्ड शार्प यांच्या जागेवर त्यांना बीबीसीच्या अद्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांनी निकषांसाठी घेतलेल्या मुलाखतींनंतर शार्प यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारण्यापूर्वी शहा यांची हाऊस ऑफ कॉमन्समधील सर्व पक्षांच्या खासदारांच्या निवड समितीकडून चौकशी करण्यात येईल. त्यानंतरच त्यांची बीबीसीच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती निश्चित होईल. डॉ. समीर शहा हे गेल्या ४० वर्षांपासून टिव्ही पत्रकारितेमध्ये सक्रिय आहेत. टीव्ही पत्रकारितेच्या बदलत्या आयामांच्या विश्वामध्ये बीबीसीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास ते योग्य व्यक्ती असतील, असे निवड समितीने म्हटले आहे.
औरंगाबादेत जन्मलेले डॉ. शहा १९६० मध्ये ब्रिटनमध्ये आले. ऑक्सफर्ड विद्यापिठाचे माजी विद्यार्थी असलेल्या शहा यांनी प्रारंभीच्या काळात बीबीसीमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रम विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते. जुनिपर या स्वतंत्र टिव्ही आणि रेडिओ चॅनेलचे मालक असलेल्या शहा यांनी २००७ ते २०१० दरम्यान बीबीसीचे संचालकपद देखील सांभाळले आहे.