रोम (इटली) :– चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हमधून इटली बाहेर पडला आहे. चार वर्षांपूर्वी इटलीने चीनच्या या बहुखंडीय विकास प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली होती. तेंव्हा या उपक्रमात सहभागी होणारा विकसित देशांच्या जी-७ देशांमधील तो एकमेव देश होता. मात्र आता इटली या उपक्रमातून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याचे इटलीतील प्रसिद्धी माध्यमांनी जाहीर केले आहे.
बीआरआयमधून बाहेर पडण्याचा निर्णय ३ दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. मात्र आता तो चीनला अधिकृतपणे कळवण्यात आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. चीन इटलीच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानावर ताबा मिळवू शकतो, अशा शब्दात अमेरिकेने सावध केल्यानंतरही २०१९ मध्ये इटलीने बीआरआयमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.
बीआरआय अंतर्गत होणाऱ्या प्रकल्पांचे करार देखील इटलीने रद्द केले आहेत. इटली आणि चीनच्या उच्चाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गैरसमजूतींबाबत अनेक आठवडे गुप्त वाटाघाटी सुरू होत्या. त्यानंतर चीनबरोबरचे संबंध नव्याने सुरू करण्यात येतील, असे इटलीने चीनला कळवले होते.
UK : अभिमानास्पद! बीबीसीच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे ‘समीर शहा’
इटलीने बीआरआयमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक वाच्यता करण्यात आली नव्हती. त्यामुळे याविषयाबाबत दोन्हीपैकी कोणीही सार्वजनिक निवेदन प्रसिद्धीस दिले नाही.
जॉर्जिया मेलोनी यांचा निर्णय
सिल्क रोड करारावर 23 मार्च 2019 रोजी इटलीचे तत्कालीन पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वाक्षरी केली होती. मात्र गेल्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी बीआरआयमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे चीनबरोबरच्या संबंधांवर परिणाम होणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. जी-२० परिषदेच्या निमित्ताने मेलोनी यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्याशी याविषयी चर्चा केली होती. आणि आपला निर्णय त्यांना सांगितला होता.