लोणी काळभोर -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे तूरडाळीसाठी 110, तर शेंगदाण्यासाठी 150 रुपये किलोला घेत असल्याचे निदर्शनास आले असल्याने बाजारभावापेक्षा जास्त दराने किराणा माल विकल्याप्रकरणी एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रदीप विष्णू जवळकर (वय 40, रा. आळंदी म्हातोबा, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष कोचेटा (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) या किराणा मालाच्या विक्रेत्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आणि साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 मार्चला सकाळी उरूळी कांचन येथे घडली.
करोना साथीच्या कालावधीत जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा चालू ठेवून, सामान्य जनतेला रास्त भावात किराणा विक्री करावी, असे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत, तरीही संतोष कोचेटा यांनी त्यांच्या दुकानातून 97 रुपये किलो असलेल्या तूरडाळीसाठी 110 रुपये आणि 110 रुपये किलो असलेल्या शेंगदाण्यांसाठी 150 रुपये अशी चढ्या दराने बाळासाहेब सयाजी कुंजीर (रा. आश्रम रोड, उरूळी कांचन, ता. हवेली) यांना व इतर सर्वसामान्य ग्राहकांना करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या कृतीमुळे जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन संतोष कोचेटा यांनी केले आहे. त्यामुळे कोचेटा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.