पुणे :– पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित व गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज प्रायोजित पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक १९ वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ओम भाबड (६८ धावा व ३-३३) याने दोन्ही डावात मिळून केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने अँबिशियस क्रिकेट क्लब संघावर ९ गडी राखून विजय मिळवला.
बारणे क्रिकेट मैदानावरील दोन दिवसीय सामन्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाच्या आज ४४ षटकात ७ बाद १८५ धावापासून खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल अँबिशियस क्रिकेट क्लबचा पहिला डाव ४३.५ षटकात १४९ धावांवर कोसळला. व्हेरॉक संघाने ५३.३ षटकात सर्वबाद २१८ धावा केल्या. यात ओम भाबडने ५९ चेंडूत १४ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६८ धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कार्तिक शेवाळे नाबाद ४५, सुश्रुत सावंत २८, नारायण डोके २३ यांनी धावा काढून संघाला ६९ धावांची आघाडी मिळवून दिली. अँबिशियसच्या गणेश कालेल (५-६४), समर्थ वाबळे(३-८१), अर्जुन साळुंके(२-३२) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
दुसऱ्या डावात अँबिशियस क्रिकेट क्लब संघ ३३.३ षटकात ११४ धावाच करू शकला. यात प्रफुल्ल कानडे ३७, गणेश कालेल २३ यांनी थोडा प्रतिकार केला. व्हेरॉककडून नारायण डोके(३-१२), ओम भाबड(३-३३), सुश्रुत सावंत(१-४) यांनी अचूक गोलंदाजी केली. विजयासाठी व्हेरॉकला ४५ धावांची आवश्यकता होती. हे आव्हान ६.१ षटकात १ बाद ४६ धावा करून पुर्ण केले. यात ओम भाबड नाबाद २०, सुश्रुत सावंत नाबाद ६ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी विलास क्रिकेट क्लब संघाच्या आज २१ षटकात ३ बाद ९६ धावांवरून खेळ पुढे सूरू झाला. तत्पूर्वी काल डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना ६८.१ षटकात सर्वबाद ३२४ धावा केल्या. याच्या उत्तरात डेक्कनच्या साहिल कड ४-५४, वरद नवांगुल २-४१) यांच्या गोलंदाजीपुढे विलास क्रिकेट क्लबचा डाव ७४ षटकात २५६ धावांवर संपुष्टात आला. यात तुषार राठोड ५७, हरिओम काळे ४५, अर्णव पुरोहित ३६, अरबाज शेख ३२, रौनक दुबे २४, राहुल वंजारी २३ यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात ६८ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाने १३ षटकात ७ बाद ९९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विलास क्रिकेट क्लबने दिवस अखेर २० षटकात ६ बाद ११७ धावा केल्या. दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिल्यामुळे पहिल्या डावातील आघाडीवर डेक्कन जिमखाना संघाने विजय मिळवला.