तुळशीबाग शुक्रवारपासून उघडणार

पुणे – तुळशीबाग दि. 5 जूनपासून उघडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुरक्षेच्या नियमांच्या अधीन राहून, ती सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील उपनगरे आणि इतर भागातील बाजारपेठ, दुकाने आता हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, तुळशीबाग कधी सुरू होणार..? हा महिलावर्गासह अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. याच प्रश्नावरील उत्तर शोधण्यासाठी सोमवारी आणखी एक पाऊल पुढे पडले. तुळशीबागेतील बाजारपेठ सुरू व्हावी, यासाठी व्यापारी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा विचार करून शनिवारी अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्यासह अन्य महापालिका अधिकाऱ्यांनी तुळशीबागेची शनिवारी पाहणी केली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, मात्र याबाबतचे अध्यादेश महापालिका आयुक्त अन्य विषयांबरोबर मंगळवारी देणार आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारपासून तुळशीबागेतील 50 टक्के दुकाने सुरू होऊ शकणार आहेत.

असे चालतील व्यवहार
एक दिवस एक बाजू आणि दुसऱ्या दिवशी दुसरी संपूर्ण बाजू, असा नियम करण्यात येणार आहे. थोडक्‍यात “पी1 पी2′ हा वाहन पार्किंगबाबत वापरला जाणारा फॉर्म्युला या ठिकाणी वापरण्यात येणार आहे. शिवाय येथे जे पथारीवाले बसतील त्यांच्यातही एकमेकांमध्ये 5 मीटरचे अंतर राहणार आहे. अशा पद्धतीने तुळशीबागेचे व्यवहार अखेर सुरू करण्यात येणार आहेत.

पालिकेच्या निर्णयाने तुळशीबागेतील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांची सुरक्षितता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून व्यापारी व्यवसाय करणार आहेत.
– नितीन पंडित, सचिव, तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशन

सुरू केलेली दुकाने केली बंद
अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केल्यानंतर दि. 1 जूनपासून तुळशीबाग सुरू होणार, असे तोंडी आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. मात्र, कोणताच निर्णय झाला नसल्याने महापालिकेने दुकाने बंद करायला लावली.

Leave A Reply

Your email address will not be published.