नेमबाज राहीचा कोल्हापुरात कसून सराव

वैयक्‍तिक सरावासाठी क्रीडा संकुल खुले

कोल्हापूर(प्रतिनिधी) -आंतरराष्ट्रीय नेमबाजांसाठी येथील विभागीय क्रीडा संकुल खुले करण्यात आले असून अव्वल खेळाडू राही सरनोबत हिने येथे सरावाला प्रारंभ केला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राहीने संभाजीनगर रेसकोर्स येथील छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर नेमबाजीच्या सरावास सुरुवात केली. तिच्यासह अनुष्का पाटील आणि अभिज्ञा पाटील या नेमबाजांनीही सराव केला.

करोनाच्या धोक्‍यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा फटका या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनाही बसला. राज्यातील अनेक क्रीडा संकुले करोनाबाधित रुग्णांना ठेवण्यासाठी शासनाने ताब्यात घेतली आणि तिथे सराव करणे बंद झाले होते. राही सरनोबत, अनुष्का पाटील आणि अभिज्ञा पाटील यांनी सराव वैयक्‍तिक घरात सुरूच ठेवला होता.

घरात सराव करणे कठीण जात होते व साहित्याचीही निकड जाणवत होती. क्रीडा संकुल सुरू झाल्याने हे खेळाडू रोज सकाळ व संध्याकाळच्या सत्रात सुमारे चार ते पाच तास सराव करत आहेत.लॉकडाऊन चारमधील अटी आणि शर्थीनुसार क्रीडांगणांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून ऑलिंम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेल्या राही, तेजस्विनी, अभिज्ञा व अनुष्का या खेळाडूंनीही कसून सराव सुरू केला आहे. विभागीय क्रीडा संकुलातील 10, 25, 50 मीटर शूटिंग रेंजदेखील खुली करण्यात आली आहे.

राहीसह अनुष्का व अभिज्ञा यांनीही दहा मीटर रेंजवर सराव सुरू केला आहे. करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या खेळाडूंना सरावासाठी मिळालेला वेळ खूपच फायदेशीर ठरणार असून त्यांच्याकडून देशाला टोकियोत पदक जिंकण्याची शक्‍यता आणखीनच वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.