पुणे: जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गीय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा तुळजाभवानी क्रीडा पुरस्कार कुस्तीपटू कोमल गोळेला देण्यात आला.
पिरंगुट येथील तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव बाळासाहेब लांडगे व महिला गृहउद्योग कार्यकारी संचालक सुरेश कोते यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामदास पवळे, ज्ञानेश्वर पवळे, स्वर्गीय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, क्रीडालेखक प्रा. संजय दुधाणे आदी उपस्थित होते. माय मुळशी वेबसाईट परिवाराच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकून जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल कोमल गोळे हिला मानपत्र, स्मृतिचिन्ह, श्रीफळ, पाच हजार रुपये रोख आणि पुस्तके देऊन तुळजाभवानी पुरस्कार देण्यात आला. सामाजिक व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज व राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतीक्षा सुतार यांना मायमुळशी पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र केसरी बाला रफिक व निवृत्त शिक्षक धोंडिबा कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दुधाणे यांनी केले तर आभार रामदास पवळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले.