- पाच कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर, मास्क घालून केले काम
- चिंच, लिंबाचा रस, रिठे, विशिष्ट रसायन, पितांबरीचा वापर
- यांत्रिकी तांब्याचे ब्रश, फरशी, पेंटिंग ब्रशचा चकाकीसाठी वापर
– रामकुमार आगरवाल
श्री क्षेत्र देहूगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 335 वा पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका, पालखी, पालखीतील आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूडटक्के, समया आणि चांदीच्या रथाला चांदीचा मुलामा (चकाकी) देण्याचे काम सोमवारी (दि. 8) सायंकाळी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे तुकोबांच्या पादुका, पालखीसह अन्य अनुभषनांना झळाळी मिळाली आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने 12 जून रोजी आषाढी वारीतील पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे तीर्थक्षेत्र देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराजांच्या केवळ पादुकाच पंढरपूरला नेण्यात येणार असल्या तरी सालाबादप्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्यात येत आहे. सोहळ्यात असलेली आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूडटक्के, समया तसेच मुख्य मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महिरप, चौकटी, दरवाजे, अभिषेकाचे व पूजेचे थाळ, चौरंग, पाट यांची पिंपरी येथील घनशाम ज्वेलर्स यांच्या वतीने पाच कारागिरांच्या मदतीने चकाकी देण्याचे काम करण्यात येत आहे.
तुकोबांची पालखी व पालखी रथाला चकाकी देण्यासाठी यंदा ही स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश वापरण्यात आल्याची माहिती ज्वेलर्सचे मालक, कामावर देखरेख करणारे कुशल वर्मा यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, हॅण्डग्लोज व मास्कचा वापर करीत आणि फिजिकल डिस्टन्सिंचे पालन करीत सर्व कर्मचाऱ्यांनी चकाकी देण्याचे काम केले. यासाठी 15 लीटर लिंबू, चिंच मिश्रीत पाणी, रिठा आणि काही रसायनांचा वापर करीत दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्याचा वापराने चकाकी करण्यात आली.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्यात असणाऱ्या अब्दागिरी व चोपदाराचा चांदीचा दंड यांनाही झळाळी देण्यात आले. काही कारागिरांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मेघडंबरी, शेषनाग, मखर “श्रीं’ची चांदीची आभुषणे, पूजेचे थाळ, तांब्याची समई, चौरंग, पाट, अभिषेक पात्र यांना चकाकी दिली. यासाठी वर्मा यांच्या देखरेखीत सुनील दीक्षित, सोयब शेख, आरिफ शेख, गब्बू खान यांनी सेवाभावाने चकाकी देण्याचे काम केले.
पालखीला पारंपरिक पद्धतीने चकाकी
यंदा संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नेहमीप्रमाणे होणार नसल्याने पालखी रथ खडकी येथील 512 वर्कशॉपमध्ये न नेता त्याची देखभाल व दुरुस्ती जागेवरच करण्यात आली आहे. पालखीला चकाकी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीचे चकाकी देण्याचे काम करण्यात आले. या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अजित महाराज मोरे, पुजारी धनंजय मोरे, सोहळ्याचे चोपदार निवृत्ती गिराम आदी उपस्थित होते.