शेगाव – श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पार्थिवावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानने दिली.
शिवशंकरभाऊ पाटील यांना सहा महिन्यांपूर्वी ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकरभाऊ यांची प्रकृती अत्यवस्थ होती.
‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ या त्यांच्या सांगण्यानुसार घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर संपूर्ण मेडिकल सेटअपसह उपचार सुरू होते. पाटील यांनी कामिका एकादशीदिनी आज सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवशंकर भाऊ पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिले असल्याकारणाने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही त्यांच्या घरी बोलावण्यात आले होते.