धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची सभा
मंचर – मंचर येथील धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेने सभासदहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. संचालक मंडळाने विश्वस्ताची भूमिका निभावल्यास सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
मंचर येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची 22 वी वार्षिक सभा झाली. यावेळी संस्थेच्या “क्यूआर कोड’ सेवेचा शुभारंभ वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे होते. संचालक पुरुषोत्तम पटेल, सुदाम बेंडे, दिलीप महाजन, पप्पूशेठ थोरात, मनीष ठक्कर, बाबाजी इंदोरे, आश्विनी शेटे, अनिता निघोट, संदीप अरगडे उपस्थित होते.
संस्थेच्या मोबाइल ऍप सेवेचा आरंभ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, लाला अर्बन बॅंकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद कराळे, माजी सदस्य राजाराम बाणखेले,डॉ. सदानंद राऊत, शिवसेना नेते सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू उपस्थित होते. ज्येष्ठ सभासद हरिभाऊ लोंढे यांचे हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ संचालक मंगेश बाणखेले यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमित चिखले यांनी विषयपत्रिकेनुसार सभेचे कामकाज चालविले. सभासदांच्या प्रश्नांना उपाध्यक्ष सुनील बाणखेले व मुख्य कार्यकारी अधिकारी चिखले यांनी समर्पक उत्तरे दिली. भास्कर लोंढे, विकास बाणखेले, अजित बेंडे, रंगनाथ थोरात या सभासदांनी चर्चेत भाग घेतला. सर्व ठरावांना मान्यता दिली. बारा टक्के लाभांश वाटपास मंजुरी दिली. मुख्य कार्यालय व कळंब शाखेकरीता इमारत खरेदीस मान्यता दिली. तीनशे साठ विद्यार्थ्यांना गौरविले. संचालिका अश्विनी शेटे यांनी आभार मानले.