नगर (प्रतिनिधी) – शिर्डी संस्थानने भाविकांना भारतीय वेशभूषेत दर्शनास येण्याचे आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात लावले असून, हे फलक काढण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई शिर्डीकडे जाण्यास निघाल्या असता त्यांना पारनेर तालुक्यातील सुपा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, देसाईं यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शिर्डीत भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. साईबाबांच्या दर्शनाला येताना भाविकांनी भारतीय पेहरावात यावे, अशी मागणी काही भाविकांनी साईबाबा संस्थानकडे केली होती.
त्यानुसार साईबाबा संस्थानने मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी भारतीय पोशाखात येण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत. त्यास आक्षेप घेत देसाई यांनी हा निर्णय व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे सांगत आपण शिर्डीत जावून हे फलक काढण्याचा इशारा दिला होता.
देसाई यांच्या या भूमिकेवरुन शिर्डीतील नागरिक व भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी पोलिसांनी देसाई यांना शिर्डीत येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावली होती. मात्र तरीही देसाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. आज त्या पुण्यातून शिर्डीकडे जात असताना, पोलिसांनी त्यांना नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर ताब्यात घेतले.
देसाई यांना पोलिसांनी सुप्यात ताब्यात घेतल्याची वार्ता शिर्डीत पोहचताच तेथील नागरिकांनी व भाविकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.