कॅराकस – व्हेनेझुएलातील अस्थिर स्थितीमुळे तेथील हजारो निर्वासित अमेरिकेत वास्तव्याला आले आहेत. तथापि त्यांची अमेरिकेतील घुसखोरी बेकायदेशीर ठरवण्यात आल्याने त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी होण्याची शक्यता होती. पण मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता या स्थलांतरितांची हकालपट्टी करण्याचा निर्णय रद्दबातल करून त्यांना मोठाच दिलासा दिला आहे.
या नागरिकांची संख्या तब्बल 1 लाख 45 हजार इतकी असून त्यातील बहुतांशी लोक ट्रम्प यांचेच समर्थक मानले जातात. त्यामुळे अध्यक्षपदाची मुदत संपण्यास केवळ एक दिवसाची मुदत बाकी असताना ट्रम्प यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी सत्तेवर असताना गेली चार वर्ष विदेशी नागरिकांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली असताना त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी मात्र या हजारो लोकांवरील हकालपट्टीची कारवाई थांबवण्याचा जो आदेश दिला आहे त्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ज्यो बायडेन हे सत्तेवर आल्यानंतर ते या लोकांवर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करतील, असा अंदाज वर्तवला जात असल्यानेच ट्रम्प यांनी तडकाफडकी हा आदेश जारी केला. त्यामुळे या स्थलांतरितांना तात्पुरता दिलासा मिळाला असून त्यांचा येथील कामाचा अधिकारही मान्य करण्यात आला आहे.