वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर टीका करणाऱ्या विदेश विभागातील महानिरीक्षक पदावरील अधिकाऱ्याला तडकाफडकी हटवले आहे. या अधिकाऱ्याची नियुक्ती ओबामा प्रशासनाच्या काळात झाली होती. देखरेख आणि स्वतंत्रपणे काम करण्याच्या अधिकारात असलेल्या या संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ट्रम्प यांनी तडकाफडकी हटवल्यामुळे त्यांच्या विक्षिप्तपणाबाबत उघड चर्चा व्हायला लागली आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारी स्टीव्ह लिनिक यांना नोकरीवरून काढून टाकले परंतु त्यांना काढून टाकण्याचे कोणतेही कारण दिले नाही, असे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 2013 पासून हे काम सांभाळलेल्या लिनिक यांच्यावर आपल्याला यापुढे पूर्ण विश्वास नाही आणि त्यांना कामावरून काढण्याची कारवाई 30 दिवसांत लागू होईल, असे कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात ट्रम्प म्हणाले आहेत.
परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची चौकशी करण्याबद्दल सूड उगवायचा म्हणून लिनिक यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे, अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.
सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनीही लिनिकच्या हकालपट्टीचा निषेध केला आहे. संविधान आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे त्यांचे कर्तव्य सन्मानपूर्वक पार पाडल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली आहे, अशा शब्दात त्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम करणाऱ्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या खासगी ईमेल सर्व्हरच्या वापराबाबत आणि ट्रम्प यांच्यावरील युक्रेन महाभियोग तपासणीतही लिनिक यांनी किरकोळ भूमिका निभावली होती. 2016 च्या निवडणूकीत युक्रेनचा सहभाग असलेली काही कागदपत्रे त्यांनी सभागृहापुढे ठेवली होती. महाभियोगाच्यावेळी त्यांनी पॉम्पिओ यांच्या हवाल्याने या कागदपत्रांचा पुरावा मांडला होता.