वॉशिंग्टन: करोनाने अमेरिकत थैमान घातले असताना आता मात्र तेथील करोना वाढीचे आणि मृत्युचे प्रमाण कमी होत असून देश आता सुरक्षित स्थितीत आला आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आता ट्प्प्याटप्प्याने खुली केली जात असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, करोना प्रसाराच्या एका नवीन टप्प्यात आपण प्रवेश केला असून हा टप्पा अधिक सुरक्षित आहे. आता आपण अर्थव्यवस्था खुली करत आहोत. करोनाने अमेरिकेत आत्तापर्यंत 71 हजार जणांचा बळी गेला असून किमान बारा लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे.
पण आता गेल्या आठवड्यापासून करोनाची लागण होंण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटताना दिसून येत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प उत्साहित झाले आहेत. आता अमेरिकेतील सप्लाय साखळी पुन्हा पूर्ववत करण्याची आणि देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण वाढवण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागणार आहे. करोनाचे मिशन अजून पूर्ण झालेले नाही पण या मिशनमध्ये आपण लवकरच विजयी होणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या वैद्यकीय गरजा भागवून आता आपण जगातील अन्य देशांना वैद्यकीय उपकरणे देऊ लागलो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. आज आपल्याकडे गरजेपेक्षा अधिक व्हेंटिलेटर्स आहेत आणि आता आपण फ्रांस, इटाली, स्पेन, नायजेरीया इत्यादी देशांना व्हीेंटलेटर्स पुरवत आहोत असेही त्यांनी सांगितले.