नवी दिल्ली : सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त माजी मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद सागर आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते सरताज मदनी यांच्याही नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे.
मेहबुबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत वाढ केल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नजरकैदेत वाढ करणे हा एकप्रकारचा क्रूर निर्णय आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले. केंद्र सरकारने त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केले आहे. मेहबुबा मुफ्ती आणि अन्य लोकांनी अशाप्रकराचे कोणतेही कृत्य केले नाही किंवा वक्तव्य केले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकार जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत आहे. मुफ्ती यांच्या नजरकैदेत तीन महिन्यांची वाढ करणे याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरला १० वर्ष मागे ढकलल्यासारखा होतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मुफ्ती यांच्या नजरकैदेचा कालावधी पूर्ण होण्याच्या काही तासांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या गृह विभागानं त्यांच्या नजरकैदेच्या कालावधीत वाढ करत असल्याचा निर्णय जारी केला.