बिजदची भाजपला अनौपचारिक साथ असल्याचा दावा
नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसने सोमवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि त्यांच्या पक्षाविषयी (बिजद) संताप व्यक्त केला. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न निरर्थक ठरतील. त्यांची भाजपला अनौपचारिक साथ आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया तृणमूलने दिली.
देश पातळीवर भाजपविरोधात एकवटण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातून पटनाईक यांच्या पर्यंतही पोहचण्याचे प्रयत्न झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पटनाईक यांची भेटही घेतली.
मात्र, केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधकांपासून समान अंतर ठेवण्याचे धोरण अवलंबणाऱ्या पटनाईक यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे मानले जाते. त्यामुळेच बहुधा तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पटनाईक यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मणिपूरमधील स्थिती चांगली नाही. पण, पटनाईक त्यावर काहीच बोलणार नाहीत, अशी टिप्पणी ओब्रायन यांनी केली. त्यामुळे अध्यात-मध्यात नसणाऱ्या पटनाईक यांच्यावर झालेला अचानक आणि अनपेक्षित शाब्दिक हल्ला विरोधकांची त्यांच्याविषयीची नाराजी उघड करणारा आहे.