कोलकाता : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज नुसरत यांची ईडीकडून पुन्हा चौकशी सुरु करण्यात आली आहे. कोलकातामधील कार्यालयात ईडीकडून नुसरत जहां यांची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील न्यू टाऊनमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याआधी 5 सप्टेंबर रोजी नुसरत जहां याच प्रकरणात ईडीसमोर हजर झाल्या होत्या. ईडीने नुसरत जहां यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. त्यानुसार आज नुसरत हजर झाल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे. नुसरत जहां या पश्चिम बंगालमधील बशीरहाटच्या खासदार आहेत.
ईडीकडून सुरु असलेला तपास हा ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटाने नुकत्याच दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे, ज्यामध्ये रिअल इस्टेट कंपनीने न्यू टाऊन परिसरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 2014-15 मध्ये 400 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एका कंपनीत पैसे जमा केले होते. यादरम्यान प्रत्येक व्यक्तीकडून 5.5 लाख रुपये घेण्यात आले आणि त्या बदल्यात त्यांना 1000 स्क्वेअर फूट फ्लॅट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, तसं झालं नाही. ना कोणाला फ्लॅट मिळाला, ना पैसे परत मिळाले.’सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीवर 23 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा नुसरत जहां यांच्यावर आरोप आहे. फसवणूक झाली तेव्हा नुसरत जहां या कंपनीच्या संचालक होत्या.
भाजप नेते शंकुदेव यांनी या संदर्भात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर ईडीने नुसरत जहां यांच्यावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा कोणत्याही कंपनीशी माझा संबंध नाही, असा दावा नुसरत जहां यांनी केला. तसंच या प्रकरणाच्या तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. तत्पूर्वी ईडी कार्यालयात दाखल होत असताना नुसरत जहां यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्याच्याकडून अनेक कागदपत्रे मागवली आहेत. या प्रकरणात अन्य लोकांचे देखील जबाब नोंदवण्यात येत आहेत.