पुणे -राज्यातील शिक्षण पद्धतीतील अध्यापन, अध्ययन परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या प्रकल्पांतर्गत मूल्यमापन प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय मूल्यमापन कक्षही स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे मूल्यमापनाची कार्यपद्धती निश्चित करणे, विविध चाचण्या व प्रश्न पेढी निर्मिती, सर्वेक्षणाचे आयोजन करण्याचे कार्य होणार आहे
“स्टार्स’ प्रकल्प राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (विद्या प्राधिकरण) सोपविण्यात आली आहे. “स्टार्स’ प्रकल्पाद्वारे शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा होणार आहेत. पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी या वर्गांना दर्जेदार शिक्षण देणे व अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येत आहेत.
विद्या प्राधिकरणात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी 16 पदांची निर्मिती केली आहे. समन्वय विभागाचे प्राचार्य हे कक्ष प्रमुख असतील. भाषा, इंग्रजी, उर्दू, गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषयासाठी 10 तज्ज्ञांची पदे ही प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील. मानसोपचार तज्ज्ञ, मूल्पमापन तज्ज्ञ, माहिती विश्लेषक, कार्यक्रम व्यवस्थापकांची पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहे.
या उपायांचा समावेश
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रमाच्या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यात मदत करणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणच्या धर्तीवर राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाचे आयोजन करणे, शाळा आधारित मूल्यमापनासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन आदि उपाययोजना या उपक्रमातून राबवण्यात येणार आहेत.