अंबर चिंचवडे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांच्या “आपला महासंघ’ पॅनलने दणदणीत विजय मिळवित महासंघामध्ये सत्तापरिवर्तन घडविले आहे. तब्बल 15 वर्षे एकहाती वर्चस्व राखलेल्या बबन झिंजुर्डे यांच्या स्व. शंकर गावडे कर्मचारी महासंघ पॅनलला पराभवाचा झटका बसला आहे. या पराभवामुळे झिंजुर्डे यांचे कर्मचारी महासंघावरील वर्चस्वही संपुष्टात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या 21 वर्षांपूर्वी झालेल्या स्थापनेपासून आतापर्यंत बिनविरोध निवडणूक होत होती. कै. शंकरअण्णा गावडे यांच्यानंतर सध्याचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे हे गेली 15 वर्षे महासंघाची धुरा सांभाळत होते. एकेकाळी बबन झिंजुर्डे यांचेच विश्वासू सहकारी राहिलेल्या व महासंघाच्या खजिनदार पदाची तब्बल 12 वर्षे जबाबदारी पार पाडलेल्या अंबर चिंचवडे यांनी दीड वर्षापूर्वी महासंघातील गैरकारभाराविरोधात आवाज उठवित वेगळा सवता सुभा मांडला होता. महासंघात चाललेल्या कथित गैरकारभार तसेच महासंघाच्या निवडणुकीबाबत आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. तसेच निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.11) रोजी महासंघाची निवडणूक पार पडली.
मतदानासाठी 6 हजार 660 मतदार पात्र ठरले होते. शनिवारी सकाळी सात ते सायंकाळी 4 या वेळेत झालेल्या मतदानामध्ये पात्र मतदारांपैकी तब्बल 81.43 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली. दहा ते साडेदहापर्यंत निकाल येणे अपेक्षित असताना रात्री दीड वाजता अखेरचा निकाला आला. आपला महासंघाचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहाटे चार वाजता घोषित केले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत पाचशेहून अधिकच्या फरकाने सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांसह आठ पदाधिकारी तर 13 कार्यकारीणी सदस्यांचा समावेश आहे.
अंबर चिंचवडे यांना सर्वाधिक मते
विजयी झालेल्या आपला महासंघ पॅनलचे प्रमुख अंबर चिंचवडे यांना काल झालेल्या मतदानामध्ये सर्वाधिक म्हणजेच 3025 इतकी मते मिळाली. त्यामुळे चिंचवडे हेच सर्वाधिक मते घेऊन विजयी होणारे उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या पॅनलमधील मात्र विजयी झालेले योगेश वंजारे यांना 2839 एवढी मते मिळाली. विजयी झालेले संपूर्ण पॅनल हे सरासरी पाचशे ते साडेपाचशे मतांच्या फरकाने विजयी झाले.
कर्मचाऱ्यांनी एकाधिकारशाही संपविली – चिंचवडे
महापालिका कर्मचारी महासंघात बबन झिंजुर्डे यांची एकाधिकारशाही होती. त्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता तोच निकालाद्वारे बाहेर पडला आणि झिंजुर्डे यांचा पराभव झाल्याने महासंघातील एकधिकारशाही संपुष्टात आली आहे. कर्मचाऱ्यांनी लोकशाही मार्गाने 21 सदस्य निवडून दिले असून, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊन काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया विजयानंतर अंबर चिंचवडे यांनी दिली. महासंघ यापुढेही पक्षविरहित काम करणार असून, विरोधकांच्या चांगल्या सूचनांचे स्वागत केले जाईल, असेही चिंचवडे म्हणाले.
राष्ट्रवादीचीही सरशी
कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीला राजकीय महत्त्वही प्राप्त झाले होते. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीही पहावयास मिळाली. आपला महासंघाच्या अंबर चिंचवडे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उघड पाठिंबा दिला होता. तर बबन झिंजुर्डे यांच्या पॅनलला भाजपाच्या दोन्ही आमदारांसह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी साथ दिली होती. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी झिंजुर्डे यांच्या पॅनलचा उघड-उघड प्रचारही केला होता. अंबर चिंचवडे यांचा पॅनल विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे मानले जात आहे. निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या होत्या.
बबन झिंजुर्डे यांचा सर्वाधिक मताने पराभव
पराभूत झालेल्या स्व. शंकरअण्णा गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या बबन झिंजुर्डे यांचा त्यांचे प्रतिस्पर्धी अंबर चिंचवडे यांनी पराभव केला. पॅनलमधील सर्वाधिक फरकाने पराभूत होणारे ते उमेदवार ठरले. झिंजुर्डे यांना 2347 इतकी मते मिळाली. 678 मतांनी झिंजुर्डे हे पराभूत झाले. तर त्यांच्याच पॅनलमधील संजय कापसे यांना सर्वाधिक 2486 इतकी मते मिळाली.
बबन झिंजुर्डे “नॉट रिचेबल’
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पॅनलप्रमुख बबन झिंजुर्डे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. पॅनलमधील इतरही त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत भाष्य करण्याचे टाळत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कामगारभवन, धन्वंतरी, मेडिकलच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीत कामगारभवनाची कथित चढ्या दराची निविदा, विमा योजनेऐवजी धन्वंतरी योजना आणि मेडिकलमध्ये झालेला कथित भ्रष्टाचार हे मुद्दे गाजले होते. विरोधी आणि आता विजयी झालेल्या आपला महासंघाच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांनी या मुद्यांवरून निवडणुकीमध्ये रंगत आणली होती. पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय बदलून नवे “कारभारी’ कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महासंघाच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान कामगार भवनाची निविदा प्रक्रिया राबविताना चढ्या दराची निविदा मान्य करून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून ठेकेदाराचे हित जपल्याचा आरोप अंबर चिंचवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. पाच कोटीत होणारे काम 10 कोटी रुपयांना दिल्याचे चिंचवडे यांनी म्हटले होते. यातून एकतर्फी निर्णय घेणाऱ्या झिंजुर्डे यांनी मनमानी केल्यामुळे महासंघाचे नुकसान झाल्याचा मुद्दा गाजला होता. याशिवाय धन्वंतरीऐवजी विमा योजना लागू करण्यास विरोध करण्यात आला होता. विमा योजना ही कामगारांच्या हिताची नसून धन्वंतरीच चालू ठेवावी, असे आपला महासंघाचे म्हणणे होते. याशिवाय कर्मचारी महासंघाच्या मेडिकलचा खरा नफा दाखविण्यात न आल्याचेही म्हटले होते.
कालच्या निकालानंतर महासंघाची धुरा अंबर चिंचवडे यांच्या हाती गेल्यामुळे धन्वंतरी, मेडिकल आणि कामगार भवनाबाबत नव्या पॅनलमधील सदस्य आणि पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.