पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) “पिनाक’ या अग्निबाणाचे हस्तांतर लष्कराकडे करण्यात आले आहे. पुण्यातील “एआरडीई’ येथे हा समारंभ झाला.
पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची प्रयोगशाळा (डीआरडीओ) आणि शस्त्रास्त्रे संशोधन आणि विकास आस्थापना (एआरडीई) येथे “पिनाक’ या अस्त्रप्रणालीचे हस्तांतरण झाले. “पिनाक’ची”ऑथॉरिटी होर्लिंडग सील्ड पर्टिक्युलर्स’ ही जबाबदारी “डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वालिटी ऍश्युअरन्स’कडे (डीजीक्यूए) सोपविण्यात आली आहे. यावेळी विविध उत्पादन संस्थांना आवश्यक असणारे दस्ताऐवज देखील सुपूर्द करण्यात आले.
डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, “डीजीक्यूए’चे महासंचालक ले.ज. संजय चौहान यांसह संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यांसह “एआरडीई’चे संचालक डॉ. व्ही. वेंकटेश्वर राव प्रत्यक्ष उपस्थित होते. “डीआरडीओ’ प्रयोगशाळा आणि “एआरडीई’ यांनी संरक्षण क्षेत्रातील अन्य संस्थांच्या सहयोगातून या अस्त्रप्रणालीची रचना आणि विकास केला आहे.
असे आहे “पिनाक’
“पिनाक’ ही दारुगोळ्याने युक्त असणारी “फ्री फ्लाईट’ पद्धतीची अग्निबाण प्रणाली आहे. या प्रणालीची कक्षा 37.5 किलोमीटर इतकी आहे. पिनाक अग्निबाण, 44 सेकंदात 12 अग्निबाण सोडण्याची क्षमता असलेल्या बहुबॅरलयुक्त अग्निबाण प्रक्षेपकातून सोडले जातात.
एएचएसपी हस्तांतरण हा पिनाक अग्निबाण प्रणालीच्या विकासापैकी महत्त्वाचा टप्पा आहे. संरक्षण सेवांच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने ही प्रणाली मोठी कामगिरी बजावेल, असा विश्वास आहे.
– डॉ. जी.सतीश रेड्डी, अध्यक्ष, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था