पिंपळे गुरव – सांगवी, पिंपळे गुरव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय व खासगी शाळा आहेत. या शाळा सुरू होण्याची व सुटण्याची वेळ एकच असल्याने येथील रस्त्यांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डन चौक येथे महापालिकेची मराठी पूर्व प्राथमिक पासून ते माध्यमिकपर्यंतच्या दोन मोठ्या शाळा आहेत. त्यामुळे हा परिसर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी कायम गजबजलेला असतो. नवी सांगवीत एम. के. चौक, कृष्णा चौक, फेमस चौक, एम. एस. काटे चौक येथील रस्त्यालगत पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. बहुतांश शाळा या इमारतीमध्ये चालवल्या जातात. लहान मुलांचे पालक वाहने रस्त्यावरच थांबवतात आणि वाहतुकीचा बोजवारा उडवतात. पिंपळे गुरवमध्ये वेगळी परिस्थिती नाही. सदर्शननगर, काशीद पार्क, सृष्टी चौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण चौक, काशी विश्वेश्वर, नावेचा रस्ता या सर्व रस्त्यालगत छोट्या-मोठ्या शाळा आहेत. येथेही परिस्थिती सारखीच आहे.
वाहन पार्किंगची समस्या
खासगी शाळांना एकच इमारत आहे. त्यामध्येच वेगवेगळ्या वेळेत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू आहे. या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस, रिक्षा, खासगी गाड्या आदी पार्क करण्यासाठी शाळेकडे व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश वाहनचालक रस्त्यात गाड्या पार्क करत आहेत. त्यामुळे या परिसरांत वाहतूक कोंडी होते.
रोडरोमिओंचा त्रास
या भागामध्ये खासकरून शाळा सुटताना भरधाव वेगाने गाडी वेडी वाकडी करून चालविणाऱ्या रोडरोमिओंचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनाही यांचा नाहक त्रास सहन करावा
लागत आहे.