सोरतापवाडी – पूर्व हवेलीतील पुणे- सोलापूर रस्त्यावर मांजरी येथे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आहे. बाजारची वेळ दुपारची असल्यामुळे शेतकरी दुपारी बारापासून शेतीमाल घेऊन येत आहेत. परजिल्ह्यांतून शेतीमाल येत असल्यामुळे बाजार समितीच्या गेटसमोर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
हा शेतमाल घेऊन येणारी वाहने तसेच शेतमाल खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने, शेतकऱ्यांची वाहनांची संख्या मोठी आहे. याठिकाणी दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दररोजच वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे हडपसर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे.
वाहतूक पोलीस याठिकाणी दिसत नाहीत. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी दिसत आहे. बाजारात माल नेण्यासाठी वाहन, चालक आडवी तिडवी गाडी घालून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. याचा सर्वात मोठा फटका रुग्णवाहिकांना बसत आहे. एकदा आडवीतिडवी वाहने घुसली की, दोन्ही बाजूला दोन किलोमीटरवर रांगा लागत आहेत. यावेळी वादावादीचे प्रकार घडत आहेत.
त्यामुळे रुग्णवाहिका अडकून रुग्णांच्या जिवीतास धोका संभवत आहे. वाहतूक कोंडी झाल्यामुळे विरुद्ध दिशेने वाहनचालक गाडी नेत आहेत. शेतमाल आणणारे वाहतूकदार, शेतकरी, व्यापारी या वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी बाजाराच्या वेळेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.