- – करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी काळजी घेऊन आनंद लुटावा
- नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे पर्यटकांना आवाहन
कर्जत : पर्यटन खुले करताच पर्यटकांनी आपल्या आवडत्या माथेरान या हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात सुरवात केली आहे. त्यातच पर्यटकांचे आकर्षण असलेली मिनी ट्रेन सेवा सुरू झाल्याने दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ सुरू असला तरी सर्व हॉटेल धारकांनी आणि माथेरान रहिवाशांनी आपली काळजी घेऊन पर्यटकाना सेवा द्यावी तसेच पर्यटकांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन माथेरान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांना केले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशात “लॉकडाउन’ जाहीर केले. यादरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू होती. तर “लॉकडाउन’मध्ये राज्यांच्या सीमा केवळ अत्यावश्यक वाहतुकीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रात तर जिल्हाबंदीच होती. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता होती. आता राज्यातील जिल्हाबंदी उठविण्यात आली आहे; तसेच गोवा आणि कर्नाटक राज्य सरकारने सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे एक सप्टेंबरपासून पर्यटन वाढीस लागले आहे. महाबेळश्वर, माथेरान, कार्ला आणि कोकणातील रिसॉर्ट पर्यटकांनी भरू लागले आहेत.
वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वोतोपरी खबरदारी घेत आहोत. करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता सर्वांना खबरदारी घेत नियम काटेकोरपणे पाळायला लावत आहोतच तरीपण व्यावसायिकांनी, स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी सुद्धा नियम पाळून आम्हाला सहकार्य करावे.
– प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, नगर गिरिस्थान माथेरान.