करोनाबाबतच्या नियमांचा फज्जा ः साथ वाढण्याची शक्यता
भाटघर- भाटघर धरण फुल भरले असल्याने पाण्याचा विसर्ग स्वयंचलित दरवाजांमार्फत सुरू आहे. हा देखावा पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे, यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत. यात भाटघर धरण व नीरा देवघर धरणाचा समावेश होतो. ही दोन्हीही धरणे पूणर क्षमतेने भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वाहते पाणी पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत. पर्यटक कुटुंबासहित येत असल्याने यात लहान मुलांचाही समावेश आहे. यावेळी पर्यटनाचा देखावा पाहत असताना पर्यटक मास्कचा वापर करीत नाहीत. करोनाचे भान न ठेवता सोशल डिस्टन्सिंगची खिल्ली उडवली जात आहे. यामुळे करोनाची साखळी न तुटता करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
भाटघर धरणाकडे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांपैकी पुण्याहून येणारे पर्यटक जास्त आहेत. यामुळे भोर, कापूरहोळ या रस्त्याला गर्दी होत आहे. पर्यटक वाहतूक व्यवस्थेचे पालन न करता धरणाच्या पूर्व दिशेला भोर-कापूरहोळ या मुख्य रस्त्यावरच गाडीची लावत आहेत, यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्राफिक जाम झाल्याने अधिक वेळ प्रवास करण्यासाठी लागत आहे.