कोयनानगर – कायमच आपत्ती पाचवीला पूजलेल्या कोयना विभागात राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 38.93 हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 271. 41 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण केंद्र कोयनानगर गोकूळ तर्फ हेळवाक येथील सोनारखडी येथे होणार आहे.
आपत्तीप्रसंगी बचाव कार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. या युनिटअंतर्गत आपत्ती परिस्थिती बचाव कार्याचे प्रशिक्षण पोलीस बांधवांना देण्यासाठी कोयना विभागात प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. शंभूराज देसाई यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून गेल्या अडीच वर्षापासून हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांची
धडपड सुरू आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे कोयना नदीच्या काठावर एकूण 38.93 हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्यता दिली. या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला व पश्चिम महाराष्ट्राला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण देणारे केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पूर परिस्थिती हाताळण्याच्या प्रशिक्षण या ठिकाणी देणे शक्य होणार आहे. तसेच या केंद्रामुळे पाटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य आपत्ती बचाव दलाकरिता आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी अशी एकूण 264 पदांसाठी 271.41 कोटी रुपयांच्या खर्चास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.