“ई-बसेस’च्या तिकीटावरुन प्रवासी संभ्रमात

भाडे जास्त असण्याचा गैरसमज : प्रवासी जुन्याच बसची वाट पाहतात
पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेत नवीन ई-बसेस खरेदी करण्यात येत आहेत. नवीन आलेल्या बसेस खूपच आकर्षक व वातानुकूलित असल्याने प्रवाशांना तिकीटाबाबत संभ्रम होत आहे. बस पाहूनच या बसचे तिकीट खूप जास्त असावे, असा गैरसमज प्रवाशांना होतो.

पर्यायाने या बसमध्ये न चढता प्रवासी जुन्या बसची वाट पाहत थांबतात. तसेच पासधारक ई-बसेसमध्ये चढताना कचरत असल्याचे “ई-बसेस’च्या वाहकांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत पीएमपी प्रशासनाने तिकीटाबाबतचे धोरण स्पष्ट केले असून ई-बसेसचे तिकीट सुद्धा जुन्या बसेस इतकेच आहे. पुऱ्या आणि जुन्या बसमुळे पीएमपी प्रवाशांना अपेक्षित सेवा देऊ शकत नव्हती. यावर तोडगा म्हणून नवीन ई-बसेस खरेदी करण्याचा निर्णय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमपीने घेतला.

यानुसार 9 फूट लांबीच्या 25 तर, परत 12 फूट लांबीच्या बीआरटी मार्गात धावणाऱ्या 50 बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. 9 फुटी 10 व 12 फुटी 15 ई-बसेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वाट्याला आल्या आहेत. नवीन आलेल्या ई-बसेस अत्यंत चकाचक, वातानुकूलित, आरामदायक असून सर्व सोयी-सुविधांनी सज्ज आहेत.

इतक्‍या चांगल्या बसचे तिकीट जुन्या बस इतकेच कसे? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांना पडत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 9 फुटी लांबीच्या 10 ई-बसेस सध्या डांगे चौक, हिंजवडी, आकुर्डी, मनपा, निगडी, भोसरी आदी मुख्य मार्गांवर धावत आहेत.

नवीन आलेल्या ई-बसेससाठी कुठल्याही प्रकारचे जादा किंवा वेगळे तिकीट आकारण्यात येत नाही. जे आरक्षण जुन्या बसेसमध्ये होते, तेच आरक्षण नवीन ई-बसेसला सुद्धा लागू आहे. यामुळे प्रवाशांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवता ई-बसेसने प्रवास करावा.

-किरण बोराडे, ई-बस सुपरवाईजर, निगडी आगार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×