थेऊर – जमीन सपाटीकरणची परवानगी मिळवून देण्यासाठी 70 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या हवेली तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनास अटक करण्यात आली आहे. तर एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हवेली महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बालाजी सुधाकर चिदरवार (वय 50, हवेली तहसील कार्यालय वर्ग-3, अव्वल कारकून) यांना अटक करण्यात आली आहे. तर संजय महादेव जाधव (वय 28) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे सपाटीकरणची परवानगी काढण्यासाठी हवेली तहसील कार्यालय येथे फेऱ्या मारत होते. वारंवार फेऱ्या मारूनही त्यांचे काम होत नव्हते. संजय जाधव यांनी जमिनीचे सपाटीकरणाची परवानगी मिळवून देतो असे म्हणून फिर्यादीकडे 70 हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावेळी करण्यात आलेल्या पडताळीत अव्वल कारकून बालाजी चिदरवार याने लाच देण्यास प्रोत्साहन दिले. हे सिद्ध झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.