टोकियो – करोनामुक्त जग हाच उद्देश समोर ठेवत केवळ आपलेच नव्हे तर जगाचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकल्याचे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाख तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मंगळवारी दिले.
मूळ वेळापत्रकानूसार ही स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीच्याच नव्हे तर जागतिक स्तरावरच्या सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी ऑलिम्पिकही पुढे ढकला अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने होत होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय होत नव्हता. कॅनडा, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांनी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला व त्यानंतर आम्ही जगाच्या सुरेक्षासाठी हा निर्णय घेतला असे बाख यांनी स्पष्ट केले.
करोनामुळे धोका दिवसेंदिवस वाढला आहे. त्यामुळे आम्हाला ऑलिम्पिक किमान एक वर्ष पुढे ढकलावी लागणार आहे, असा प्रस्ताव अबे यांनी बाख यांना पाठविला होता, तो मान्य करण्यात आला व अखेर ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. अर्थात असे असले तरीही ही स्पर्धा 2021 मध्ये उन्हाळ्यापूर्वीच घेण्यात येणार असल्याचे अबे यांनी सांगितले आहे.
अशा अत्यंत तणावाच्या वातावरणात ही स्पर्धा घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नव्हता. बाख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार असली तरी ती टोकिओ ऑलिम्पिक 2020 याच नावानेच ओळखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑलिम्पिक पुढे ढकलण्याची आलेली वेळ ही पहिल्यांदा आलेली नाही. इतिहासात डोकावले तर 3 वेळा ही स्पर्धा विविध कारणांनी रद्द करावी लागली आहे. यापूर्वी, 1916, 1940 व 1944 सालच्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या होत्या.