टोकियो – जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्याने आता रिकामेच राहणारे क्रीडाग्राम करोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी विलगीकरण कक्ष बनणार आहे.
चीनकडून जगभर पसरलेल्या करोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्याने रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी रुग्णालये देखील कमी पडत आहेत. चीनपाठोपाठ इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड यांच्यासह भारतातही करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. भारतात हे प्रमाण सध्यातरी कमी दिसत आहे.
जपानमध्ये मात्र या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. देशाची लोकसंख्या पाहता तिथे रुग्णालये सामान्य स्थितीत सहज उपलब्ध होतात. मात्र, करोनाचा प्रसार वाढल्याने रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे येथील क्रीडा मंत्रालयाने जपान ऑलिम्पिक संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते, त्याला संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला व क्रीडाग्राम उपलब्ध करुन देण्यात येणार असून तिथे विलगीकरण कक्ष तसेच प्राथमिक उपचारांचे रुग्णालय तयार केले जाणार आहे. अर्थात ज्या कंपनीने हे क्रीडाग्राम तयार केले त्यांनी याबाबत कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, महापौरांनी क्रीडाग्राम उपचारांसाठी देण्यात येण्याबाबत ग्वाही दिली आहे.
11 हजार ऑलिम्पिकपटू तसेच जवळपास 4 हजार पॅरालिम्पिकपटूंच्या निवासाची व्यवस्था होऊ शकते इतके मोठे क्रीडाग्राम ऑलिम्पिक पुढे गेल्याने या काळात बंदच राहिले असते मात्र, आता त्याचा खरा उपयोग होणार आहे. जपानमध्येही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत 3 हजारांपेक्षा जास्त बाधित आढळले असून सुमारे 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करदात्यांवर बोजा…
ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्यामुळे स्पर्धा आयोजकांना जवळपास 5 अब्ज डॉलरचा अतिरीक्त फटका बसणार असून पुढील वर्षीही तयारीसाठी आणखी रक्कम तयार ठेवावी लागणार आहे. अर्थातच याचा बोजा देशाच्या करदात्या नागरिकांवर पडणार आहे.