भीमसृष्टीचे आज उद्‌घाटन

पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी साकारली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग येथे ब्रॉंझ धातुतील 19 म्युरल्सच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) दुपारी 3 वाजता उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

तसेच, या प्रसंगी माता रमाई पुतळ्याच्या कामाला देखील प्रारंभ केला जाणार आहे. येथील भीमसृष्टीत प्रवेश करण्यासाठी सांची स्तूपाच्या धर्तीवर उभारलेले प्रवेशद्वार लक्षवेधक आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार, पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे, भन्ते डॉ.राहुल बोधी आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी प्रकल्प उभारण्याचे काम मार्च 2016 मध्ये सुरू झाले.

या प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे. येथील जागेचे क्षेत्रफळ 2363 चौरस मीटर इतके आहे. या जागेमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग मांडणाऱ्या 4 मोठ्या आकाराच्या ब्रॉंझमधील म्युरल्ससह एकूण 19 म्युरल्स साकारले आहेत. म्युरल्समधील प्रसंगांची माहिती ग्रेनाईट पाटीवर कोरून लावण्यात आली आहे. मुख्य पुतळयासमोर आकर्षक कारंजे उभारले आहे. त्याशिवाय, पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×