केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसांच्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी नुकतीच माहिती दिली. यामध्ये जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करणे हा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय होता असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेणे हा आमचा पुढील अजेंडा असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
#WATCH Union Min Jitendra Singh:Next agenda is retrieving parts (PoK) of Jammu&Kashmir & making it a part of India. It’s not only my or my party’s commitment,but it’s a part of unanimously passed resolution of Parliament in 1994 by Congress govt headed by PM Narasimha Rao (10.09) pic.twitter.com/jcpfNYyafN
— ANI (@ANI) September 10, 2019
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावर भाष्य करताना त्यांनी इतर देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनुकूल असल्याचे ते म्हणाले. काही देश भारताच्या निर्णयाशी सहमत नव्हते, परंतु आता ते सहमत आहेत. काश्मीरमध्येही सामान्य जनतेला मिळणाऱ्या लाभांमुळे सर्वच जण आनंदीत आहेत, असंही जितेंद्र सिंग यांनी नमूद केले. काश्मीरमध्ये सध्या कर्फ्यूही नाही आणि बंदही नाही. त्याठिकाणी केवळ काही निर्बंध घालण्यात आले आहेत. आपण काहीही करू आणि त्यातून सुखरूप बाहेर पडू या मानसिकतेतून विरोध करणाऱ्यांनी आता बाहेर पडायला हवे. विरोध करणाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो, असेही ते म्हणाले. तसेच काश्मीरच्या या निर्णयानंतर आता पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताच्या ताब्यात घेणे हे आमच्या सरकारचे पुढचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.