मद्यप्राशन करणाऱ्यास पाच हजारांचा दंड

राजगुरूनगर – पांगरी येथे पहिल्यांदाच “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली असून गावातील या विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे. अनेक मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव मंडळाच्या खर्चात बचत होऊन तो गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय एकमताने गावाने घेतला आहे. याबाबरोबरच या गावात सार्वजनिक कार्यक्रमात दारू पिऊन येणाऱ्या ग्रामस्थाला 5 हजार रुपये दंड सुरू केल्याने या निर्णयाचे गावातील सर्वानी स्वागत केले आहेत तर इतरांना प्रेरणा दिली आहे.

पांगरी हे गाव राजगुरूनगर शहरापासून अगदी तीन किमी अंतरावर आहे. या गावात अनेक वस्त्या आहेत. या वस्त्यांमध्ये गणपती मंडळे सक्रिय होती. त्यांच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा केला जायचा मात्र त्यावरी खर्च आणि मंडळांमध्ये लागलेली चढाओढ यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ लागले. हे वाद कधी कधी विकोपाला जात असल्याने गावातील सामाजिक शांतता बिघडत होती.गावाच्या विकासासाठी सर्व वस्त्यांतील नागरिक एकत्र असणे गरजेचे असल्याने अनेकदा सर्वजण एकत्र येऊन सामाजिक उपक्रम केले जात होते;मात्र गणपती उत्सव वेगवेगळा साजरा होत होता. त्यामुळे नागरिकांनी “एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडली. गाव आणि वस्त्या मिळून असलेल्या पाच गणपती मंडळांचे पदाधिकारी यांच्याशी सर्वांनी चर्चा केली अन्‌ त्यास सर्व मंडळांनी पाठिंबा देत गावात “एक गाव एक गणपती’ची स्थापना केली. मंडळाच्या खर्चात बचत झाली असून ही रक्‍कम गावाच्या विकासासाठी देण्याचे मान्य करण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात दारू पिऊन जायचे नाही जर गेले तर 5 हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय सर्वांना मान्य झाल्याने गावातील एकजूट वाढली आहे. गावात सामाजिक शांतता आणण्याचा ग्रासस्थांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. गावाच्या विकासात राजकारण न आणण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने अनेक विकास कामे पूर्ण करता आली आहेत ही एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न असून गावाच्या विकासात युवकांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम खांडगे यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.