कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या ‘या’ औषधांचा काळाबाजार रोखणार

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

मुंबई : कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर (Remdesivir) व टॉसिलिझुमॅब (Tocilizumab) या औषधांचा काळाबाजार रोखणार, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सांगितले.

या विषयाच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्या अध्यक्षतेखाली व अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत Remdesivir व Tocilizumab या औषधांचे उत्पादन, त्याची उपलब्धता, वितरण प्रणाली इ. बाबतचा आढावा घेण्यात आला. या औषधांचा काळाबाजार होत असल्यास अन्न व औषध प्रशासन अधिकारी व पोलिसांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पोलीस मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना पुरवठादाराने ज्यादा किंमत आकारल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 अथवा नजिकच्या कार्यालयास माहिती द्यावी असे मंत्री डॉ. शिंगणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या बैठकीला, सुबोध जैस्वाल, पोलीस महासंचालक, परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई, श्रीमती रश्मी शुक्ला, आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक(का व सु), संजय मुखर्जी, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, सुनिल भारद्वाज, सहआयुक्त दक्षता आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.