पुणे – अस्वच्छता करणाऱ्यांकडून तिप्पट दंड वसूल केला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे आणि अस्वच्छता करणाऱ्यांकडून महापालिकेने गेल्या वर्षभरात 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. नवीन नियमानुसार तिसऱ्यावेळी संबंधित संस्था, व्यक्ती यांच्याकडून दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे.
महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियमावली केली होती. त्यामध्ये शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडाची तरतूद केली होती. ही नियमावली अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवली होती. परंतु, या नियमावलीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मात्र, राज्य सरकारने या नियमावलीच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकच नियमावली लागू केली आहे.
या नियमावलीच्या आधारे आता दंड वसूल केला जात आहे. उघड्यावर कचरा टाकण्यासंदर्भात घरगुती, निवासी मिळकती असणाऱ्यांकडून पहिल्यावेळी 500 रुपये, दुसऱ्यावेळी 750 रुपये आणि तिसऱ्यावेळीपासून पुढे प्रत्येकवेळी 1 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. त्याचप्रकारे बिगर निवासी मिळकती आणि संस्थांनी या नियमाचा भंग केला तर त्यांच्याकडून प्रत्येकवेळी अनुक्रमे 1 हजार, दीड हजार आणि 2 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
कारखाने आणि उद्योगांकडून नियम भंग झाल्यास त्यांच्याकडून 2 हजार रुपये, 3 हजार रुपये आणि 4 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्यावर घाण करणाऱ्यांकडून प्रत्येकी 180 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 150 रुपये, रस्त्यावर लघुशंका करणे 200 रुपये, उघड्यावर शौच करणे 500 रुपये, सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांकडून होणारी अस्वच्छतेसाठी संबंधित मालकाकडून 180 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या जास्त
घनकचरा व्यवस्थापन विभागाने गेल्या वर्षभरात 44 हजार 31 जणांवर कारवाई करून 1 कोटी 79 हजार 215 रुपये दंड वसूल केला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 40 हजार 679 जणांकडून 88 लाख 87 हजार 726 रुपये दंड वसूल केला. रस्त्यावर शौच करणे, लघुशंका करणे, थुंकणे असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवणाऱ्या गृहप्रकल्पांवरही कारवाई केल्याची माहिती घनकचरा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.