चंदिगढ : पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात एक तीन मजली इमारत आज अचानक कोसळली. शेजारी खोदकाम सुरू असल्यामुळे ही इमारत कोसळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
तळघर बांधण्यासाठी जेसीबी मशीनच्या माध्यमातून खोदत असताना ही व्यावसायिक इमारत कोसळली, असे खरार उपविभागीय दंडाधिकारी हिमांशू जैन यांनी सांगितले. जेसीबी मशिनचालकासह अन्य दोघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांच्यासह या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांना सोडवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 30 सदस्यांचे पथक प्रयत्नशील आहे. जेसीबीने कदाचित इमारतीच्या पायावर जोरदार धक्का दिला असावा. परंतु घटनेचे नेमके कारण चौकशीनंतर कळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खारार-लॅंड्रान रोडवर घडलेल्या घटनेची दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खरारच्या एसडीएमला घटनेची चौकशी करण्याचे व तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मोहालीचे उपायुक्त गिरीश दयानन म्हणाले. खोदकामाची परवानगी घेण्यात आली होती का, याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.