क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरसचा तांडव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत या व्हायरसने 803 जणांचा बळी घेतला आहे. तर 37 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर दुसरीकडे जपानच्या योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रूज जहाज डायमंड प्रिंसेसमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. या क्रूजवर 130 हून अधिक भारतीय देखील अडकले आहे. स्वगृही परतण्यासाठी या सर्वांना 10 दिवसांची वाट पाहावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवळपास 3700 प्रवाशी या क्रूजवर आहेत. यामध्ये 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये 21 जपानी, 5 ऑस्ट्रेलियन, 5 कॅनडाचे आहेत. मात्र 3700 प्रवाशी जहाजवर असल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. या व्हायरसचा प्रसार वेगाने होण्याची भीती आहे. या अलिशान क्रूज जहाजावर उपस्थित भारतीयांसाठी सरकार सतत जपानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत माहिती दिली की, जहाजात काही भारतीय प्रवासी आहेत. त्यांच्या माहितीसाठी आम्ही भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहोत.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड प्रिंसेस क्रूजवर 3700 प्रवाशांमध्ये सहा भारतीय आहेत. तर जवळपास 130 कर्मचारी सदस्य भारतीय आहेत. समाधानकारक बाब म्हणजे सर्व भारतीयांचे कोरोना व्हायरसचे सर्व नमुने नेगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्यापही हे सर्व भारतीय प्रिंसेस क्रूजवर असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोणतीही मोहीम भारताकडून राबवली जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना 19 फेब्रुवारी पर्यंत जहाजावरच राहावे लागणार आहे. तोपर्यंत कुणालाही जहाजाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.