संगमनेर – तालुक्यातील मनोली येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले. सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास योगेश अशोक भंवर (वय 25) हा तरुण डेअरीवर दूध घालून दुचाकीवरून कोल्हेवाडी-मनोली रस्त्याने घराकडे निघाला होता. त्याच वेळी शिकारीच्या शोधात खैर ओढ्याजवळ उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. सुदैवाने बिबट्याचा अंदाज चुकल्याने योगेशच्या हाताला त्याचा पंजा लागल्याने जखम झाली. घाबरलेला हा तरुण तसाच सुसाट दुचाकी घेऊन घरी आला.
या हल्ल्याची चर्चा संपते न संपते तोच कोल्हेवाडीतील सचिन जगन्नाथ दिघे (वय 29) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे वृत्त आले. दिघे हे आपल्या पत्नीसह श्रावणी सोमवारनिमित्ताने निझर्णेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता. रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हे दांपत्य दुचाकीवरुन घरी परतत असतानाच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या पंजाची तीक्ष्ण नखे पायाला लागल्याने दिघे जखमी झाले. त्यामुळे ते दुचाकीवरून पडले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या उसात पळून गेला.
या दोघांना संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आणखी एका वृद्धावर बिबट्याने तेथेच हल्ला केल्याची माहिती मिळाली. मात्र त्याची अधिक माहिती मिळू शकली नाही. एकाच दिवशी तिघांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरे लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.