– सुनील राऊत
पुणे : महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमासाठी वितरीत करण्यासाठी आणलेल्या नॉन ओव्हन पॉलीप्रोपोलिन बॅग जप्त करण्याची कारवाई पालिकेने सुरू केलेली आहे. बंदी असतानाही वितरीत करण्यासाठी आणलेल्या या पिशव्यांची माहिती दैनिक प्रभातने ऑनलाईन वृत्तद्वारे समोर आताच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापण विभागाकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
राज्यशासनाच्या व न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई सुरू केली आहे. त्यात पालिकेने जवळपास 47 टन प्लॅस्टिक जप्त केले असून त्यात या नॉन ओव्हन बॅग समावेश आहे. या बॅगला बंदी असल्याने पालिकेने त्या जप्त केल्या असून विक्रेत्याकडून दंडही वसूल केला आहे.
बुधवारी पालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून महिलांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी महिलांना पुस्तिका आणि माहिती पत्रक देण्यासाठी चक्क या बंदी असलेल्या प्लास्टिकच्या हजारो बॅग वितरीत करण्यासाठी आणण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. मात्र, ही बाब समोर येताच. या पिशव्या पालिकेने वितरण करणे बंद केले आहे. तसेच या पिशव्या पालिकेच्या नसल्याच्या खुलासाही पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.