मंचर -आंबेगाव तालुक्यात निरगुडसर, जवळे व पश्चिम आदिवासी भागातील शिनोली या गावांतील तिघांना करोना विषाणूची लागण झाली आहे. रविवारी (दि. 24) या तीनही रुग्णांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या वतीने तीनही गावे ही सील करण्यात आली आहेत.
निरगुडसर, जवळे, शिनोली या गावांमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी हे रुग्ण मुंबईवरून गावाला आले आहेत; परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. रविवारी (दि. 24) दुपारी या तीनही रुग्णांचे वैद्यकीय अहवाल हे पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन या गावांना जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी केली असून गावे सील केली आहेत. तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक निरीक्षक प्रदीप पवार आदी पदाधिकाऱ्यांनी या गावांना भेट दिली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
केले आहे.
आंबेगाव तालुक्यामध्ये यापूर्वी साकोरे येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. आता निरगुडसर, जवळे, आणि शिनोली येथे दुसरा रुग्ण आढळून आला आहे. यामुळे तालुक्यात आता करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण पाच झाली आहे. हे रुग्ण मुंबई येथून आलेले असल्याने मुंबईकरांमुळेच आंबेगाव तालुक्यात करोनाचा शिरकाव झाल्याचे नागरिक सांगत आहेत.