लोणी काळभोर -कदमवाकवस्ती येथील 62 वर्षीय करोना बाधित आजोबांच्या दोन वर्षीय नातवालाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वामी विववेकानंद नगरमधील रहिवासी असलेले एक 62 वर्षीय रुग्ण गुरुवारी (दि. 21) करोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. या रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या दहा नातेवाइकांपैकी रुग्णाची दोन मुले वगळता, त्यांच्या घरातील आठ जणांचे अहवाल रविवारी मिळाले आहेत. आठपैकी सात जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, रुग्णाचा दोन वर्षीय निरागस नातू मात्र पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत मागील महिनाभराच्या काळात विविध वयोगटातील 14 करोनाबाधित रुग्ण आढळुन आले होते. यापैकी एकाचा अपवाद वगळता, 13 जणांच्या एकाही जवळच्या नातेवाइकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले नव्हते. केवळ कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळवाडी येथील एका रुग्णाच्या दोन नातेवाइकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र मागील 24 तासांत रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या दोन लहान मुलांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने आत्ता मात्र पूर्व हवेलीत भीतीचे वातारण पसरले आहे.
14 रुग्ण आढळूनही शिस्त नाही
पूर्व हवेलीत 17 एप्रिलपासून आत्तापर्यंत 14 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी लोणी काळभोर, उरूळी कांचनसह सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व त्यांचे सहकारी, लोणी काळभोर पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी विविध उपाय योजना करत आहेत.
नियमांचे पालन करण्याच्या सूचना वेळोवेळी देत आहेत; अपवाद वगळता बहुसंख्य नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. मास्क न लावता व सोशल डिस्टन्स न पाळता अनेकजण रस्त्यावर येत आहेत.
दररोज भाजीपाला, किराणा सामान खरेदीचे कारण दाखवून बरेचसे नागरिक विनामास्क फिरत आहेत. यामुळे आगामी काळात पूर्व हवेलीत करोनाचा उद्रेक झाल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.