राजगुरूनगर -खेड तालुक्यात आज (दि. 29) तीन गावांत तीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 झाली असून त्यापैकी 5 जण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
वेताळे, वाजवणे, वाशेरे या तीन गावांत प्रत्येकी एक करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. तर तालुक्यातील येलवडी येथील एक बाधित सापडला असून त्याची नोंद पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे.
आज वाशेरे, करोना रुग्ण आढळलेल्या गावात गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना आवश्यक सूचना दिल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांत संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या माध्यमातून करोना बाधित गावांना भेटी देऊन खबरदारीची उपाययोजना कार्यान्वित केली जात आहे.
तालुक्यातील तब्बल 12 गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. पाईट, कुरकुंडी, झित्राईमळा(चाकण), कडूस, वडगाव, पापळवाडी, राक्षेवाडी, वडगाव तर्फे खेड या गावानंतर आता वाजवणे, वेताळे, वाशेरे येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने तालुक्याचा पश्चिम भाग हादरला आहे. मुंबई, पुणे वरून येणाऱ्या नागरिकानी काळजी घेत स्वता क्वॉरंटाईन व्हावे.प्रशासनाला माहिती द्यावी गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी जावे असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.