पुणे – भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या खुनाचा कट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. त्यांच्या शोधासाठी, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली.
तर बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले. हा गुन्हा बनावट आणि खोटा आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दाखल केल आहे. केवळ संशयावरून ही कारवाई केल्याचा युक्तीवाद ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला. त्यांना ऍड. हितेश सोनार आणि ऍड. दिग्विजय ठोंबरे यांनी मदत केली.
विकी ऊर्फ वितुल वामन क्षीरसागर (वय 33), मनोज संभाजी पाटोळे (वय 33, दोघेही रा. साने गुरुजी वसाहत, नवी पेठ) आणि महेश इंद्रजित आगलावे (वय 25, रा. लोहियानगर) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत धीरज रामचंद्र घाटे (वय 46, रा. स्नेहनगर, नीलायम चित्रपटगृहाजवळ, सदाशिव पेठ) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.7 ) रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटे हे त्यांचे कार्यकर्ते अमर साबळे यांच्यासह 3 सप्टेंबर रोजी शास्त्री रस्त्यावर असलेल्या हॉटेल सॅफ्रनमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या मागून तीन व्यक्ती येऊन बसल्या. त्यातील एकाच्या हातात काळी पिशवी होती. त्यांच्या संशय आल्याने साबळे हे हॉटेलच्या बाहेर गेले. त्यावेळी कट उघड झाला. त्यानंतर घाटे यांनी सोमवारी (दि. 6) हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले व फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अभय महाजन तपास करत आहेत.