सातारा -लंपी स्किन आजाराने गेल्या वर्षी पशुधनाला मोठा धोका निर्माण झाला होता. यावर्षी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील 3 लाख 52 हजार 436 जनावरांचे लसीकरण होणार असून सध्या एक लाख 51 हजार लस उपलब्ध झाली आहे. प्रत्येक तालुक्याला लसींचे वितरण करण्यात आले आहे. लसीकरण मोहीम जुलै महिनाअखेर चालणार असून या कालावधीत गायवर्गीय सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
राज्यात गेल्या वर्षी लंपी स्किनचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले होते. त्यानंतर जनावरांचे लसीकरण जिल्ह्यात गतीने राबवण्यात आले होते. बाधित पशुपालकांना शासन नियमानुसार मदतही देण्यात आली होती. आगामी काळात लंपीचा प्रादुर्भाव वाढून पशुधनाला बाधा पोहचू नये यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.
जिल्ह्यात गाय, बैल, वासरे यांची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून या सर्व जनावरांना लंपीची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एक लाख 51 हजार लस उपलब्ध झाली असून प्रत्येक तालुक्याला लसीचे वितरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अखत्यारित लसीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी लसीची मागणी करण्यात येत असून जुलै महिनाअखेर लसीकरण पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.
लंपी स्किनचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात होता. पशुसंवर्धन विभागाने पशुधनाला वाचवण्यासाठी परिश्रम घेतले. यावर्षी अद्याप कोठेही बाधित जनावरे आढळली नसून लंपीचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पशुपालकांनी लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे.
– महादेव घुले
(अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)
==================== ===