‘आयटीआय’ला अखेर तीन एकर जागा

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : सातव यांच्या पाठपुराव्याला यश

वाघोली – अनेक वर्षापासून शासकीय औद्योगिक संस्थेचा प्रलंबित असलेला जागेचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी वाघोली येथे तीन एकर जागा संस्थेला देण्याबाबतचा आदेश दिले. संस्थेचे प्राचार्य उदय सूर्यवंशी व आरटीआय कार्यकर्ते किशोर सातव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून गेले सात वर्षापासून वाघोली येथील गट नं. 1413 मध्ये संस्थेला जागेचा ताबा मिळावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे वारंवार केली होती. आयटीआयच्या वतीने अनेकवेळा जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, या जागेवर असणारी अतिक्रमणे व गार्डनमुळे 67 गुंठे जागाच उपलब्ध होत होती.

आयटीआयच्या वतीने 120 गुंठे मिळविण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते सातव यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. सातव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दि. 30 जून 2018 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हवेली प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात गट क्रमांक 1413 मधील 120 गुंठे जागेची मोजणी करण्यात आली. जिल्हापरिषद शाळेचे व इतर अतिक्रमण असल्याने 120 गुंठे जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मोकळी 67 गुंठे व गार्डनचे अतिक्रमण असलेली 27 गुंठे जागा ताबा पावती करून संस्थेला दिली होती. गार्डनची जागा दिल्यामुळे वाघोली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र विरोध केला होता.

आरटीआय कार्यकर्ते किशोर सातव म्हणाले की, संस्थेला जागा मिळावी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळे समाधान वाटत आहे.

औद्योगिक संस्थेला हक्‍काची तीन एकर जागा मिळाली आहे. सद्य:स्थितीत संस्था भाड्याच्या जागेवर आहे. भाड्यापोटी शासनाच्या होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होणार आहे. वाघोलीला आयटीआयच्या माध्यमातून हवेली तालुक्‍याचे प्रतिनिधित्व करण्याचे श्रेय मिळणार आहे.
– उदय सूर्यवंशी, तत्कालीन प्राचार्य.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.