मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर एच आर रिलायन्स फाउंडेशन इस्पितळात दोनदा फोन करून अज्ञात व्यक्तीने धमकी दिली होती. मुकेश अंबानी यांना तसेच त्यांचे निवासस्थान अँटिलिया बॉम्बने उडवणार असल्याचे त्याने म्हटले होते. अंबानी कुटुंबातील सगळ्यांनाच मारण्याची धमकी देण्यात आली होती.
राकेश मिश्र असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांची एक टीम साध्या वेषात राकेशच्या बिहार येथील घरी पोहोचली होती. त्यांनी दार ठोठावल्यावर आरोपीनेच ते उघडले. त्यानंतर त्याच्या फोनवर कॉल करण्यात आला. तो फोन त्यानेच उचलल्यावर त्याला पकडण्यात आले.
दरम्यान, राकेश हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे तर त्याचे वडील सरकारी कर्मचारी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बिहारमधून दोन वेळा फोन आल्यानंतर सावध झालेल्या मुंबई पोलिसांनी दरभंगा येथील पोलिसांशी संपर्क साधला होता व त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली.