7,975 युवक-युवतींना रोजगाराभिमुख मार्गदर्शन
पुणे – स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या “लाइट हाउस’ प्रकल्पामुळे आतापर्यंत 3 हजार 9 जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. शहरात सहा ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत 7 हजार 975 युवक-युवतींना रोजगाराभिमुख मार्गदर्शन करण्यात आले असून, त्यापैकी प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या 3,849 युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शिक्षणाची कमतरता तसेच योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक युवक-युवती बेरोजगार राहातात. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने स्मार्ट सिटी योजनेमध्ये लाइट हाउस प्रकल्प राबवण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून शहरातील भागात महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली असून स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने ते चालवण्यात येतात. यामध्ये औंध, येरवडा, हडपसर, वारजे, भवानी पेठ आणि बिबवेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा समावेश आहे.
याठिकाणी नोंदणी केलेल्या युवक- युवतींचे समुपदेशन केले जाते. त्यांच्या आवडीनुसार त्यांना नोकरी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतो. या सहाही लाईट हाउसमध्ये दर महिन्याला 35 ते 60 युवक नोंदणी करतात. आतापर्यंत 7,975 जणानी नोंदणी केल्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना नोकरी मिळावी यासाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून कॅम्पस इंटरव्यूव्हच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. आतापर्यंत 3009 जणांना यातून नोकरीही मिळाली आहे. बहुतांश प्रशिक्षणार्थींना 8,500 ते 10,200 रुपये विद्या वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.