नवी दिल्ली- भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टीसीएस कंपनी शेअरची फेरखरेदी करण्यावर म्हणजे बायबॅकवर विचार करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 जानेवारी रोजी होणार असून या बैठकीतील विषय पत्रिकेवर बायबॅकचा विषय असेल असे सांगण्यात आले.
12 जानेवारी रोजी कंपनीच्या तिसऱ्या तीमाहीच्या ताळेबंदावर विचार होणार आहे. यावेळी बॉयबॅकवरही विचार होईल एवढेच सांगण्यात आले. याचा तपशील देण्यात आला नाही. सप्टेंबरअखेर कंपनीकडे 51 हजार 950 कोटी रुपयांची रोख आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने 16,000 कोटीचे शेअर बायबॅक केले होते. 2018 मध्ये ही कंपनीने तेवढ्याच रकमेचे शेअर बायबॅक केले होते.